बिडकीन, (प्रतिनिधी) : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या विविध समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा आज बिडकीन येथे यशस्वीपणे पार पडला.
सुजित आयोजित लॉन्स येथे या शिबिरात शेतकरी, प्रकल्पग्रस्तव ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसून आला. या शिबिरात मार्गदर्शन करताना आ. विलास भुमरे यांनी सांगितले की, शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. विविध शासकीय योजना व निर्णयप्रत्यक्षजनतेपर्यंत पोहोचावेत यासाठीच असे शिबिर उपयुक्त ठरत आहेत.
उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार, महसुली सेवा, उत्पन्न व रहिवासी दाखले, नॉन-क्रिमिनल प्रमाणपत्र, वारस नोंदी अशा अनेक सेवांचे प्रश्न त्वरित मार्गी लावले जात आहेत.
नागरिकांनी आपले प्रश्न महसूल विभागाकडे थेट मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले. सरपंच अशोक धर्मे यांनी बिडकीनच्या शहरीकरणाचा मुद्दा उपस्थित करत गावठाण हद्दवाढ, भविष्यातील पाणीटंचाई व शहराच्या मध्यभागी प्रस्तावित टोल नाक्यामुळे होणाऱ्या अडचणींबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली.
वाढत्या डीएमआयसी यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल आमदार विलास भुमरे व उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांचा प्रकल्पग्रस्त समितीतर्फ सत्कार करण्यात आला.











